लातूर: लातूर शहरात बहुतांश ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने पुरुष आणि महिला सगळ्यांचीच गैरसोय होते. गांधी चौक सोडला तर लोक कुठेही आटोपून घेतात. दयाराम मार्गावरही वाघमारे पॉवर लॉंड्रीसमोर अनेक वर्षांपासूनचे आटोपून घेण्याचे ठिकाण होते. वर्षानुवर्षे साचलेल्या घाणीमुळे या परिसरात मुबलक दुर्गंधी सहन करावी लागत असे. यावर इथल्या तरुणांनी नामी उपाय काढला. औसा हनुमान कट्ट्याप्रमाणेच प्रभात कट्टा तयार करण्याचे ठरवले. योगेश हल्लाळे यांनी वाढदिवसानिमित्त पुढाकार घेत या ठिकाणी सिमेंटचे बाक दिले. नगरसेवक व्यंकट वाघमारे यांनी त्याला साथ देत आणखी काही दात्यांना तयार केलं. बघता बघता सहा बाक जमले. या तरुणांनी काल पाण्याचा टॅंकर आणून सगळी घाण साफ केली. जंतूनाशक पावडर फवारून घेतली. आज हा कट्टा तयार झाला आहे. या कट्ट्यावर रोज दिवसभर वर्तमानपत्रे वाचायला मिळणार आहे. थकलेल्यांना, वृद्धांना विरंगुळा घेता येणार आहे. जाकेरभाई पठाण, पुरुषोत्तम देशमुख, योगेश हल्लाळे, सौरव शळके आणि प्रभात मित्रमंडळाची टीम याकामी परिश्रम घेत आहे.
लातूर शहरात अनेक ठिकाणी घाण केली जाते. अशी ठिकाणे निवडून त्या ठिकाणी कट्टे उभारणे, लोकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करुन देणे ही बाब स्वागतार्ह आहेच पण त्यासोबतच मनपाने स्वच्छतागृहांची सोय करणे आवश्यक आहे.
Comments