लातूर: लातुरच्या भावडासिंग जुन्नी याचा मृतदेह आज सकाळी अशोक हॉटेलजवळील जुन्या गोरक्षण विहीरीत आढळला. सकाळी आठच्या सुमारास या भागात राहणार्या नागरिकांनी तो पाहिला. पाण्यावर हा मृतदेह पालथा पडला होता, तरंगत होता असं इथले रहिवासी सांगतात. तातडीनं या मंडळींनी ही बाब शिवाजीनगर पोलिसांना कळवली. पोलिस आले, कारवाई सुरु झाली. दरम्यान जुन्नी बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसात दाखल झाली होती. पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली हे कळाले नाही. आज मात्र आवश्यक कार्यवाही करुन त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात रवाना करण्यात आला. जुन्नीचा खून झाला असावा कारण बुडालेला माणूस लगेच वर येत नाही असं काहीजण बोलत होते. तर जुन्नीचा सासरच्या मंडळीशी वाद होता, त्यातूनच हा प्रकार घडला असावा असं त्या ठिकाणी जमलेले काही लोक बोलत होते. शव विच्छेदनगृहाबाहेर जुन्नीचा मित्र परिवार आणि नातलगांनी मोठी गर्दी केली होती. वातावरण तप्त झाले होते.
Comments