लातूर: अमृत पेयजल योजनेअंतर्गत रस्ते खोदताना तुटलेल्या नळाच्या पाईपलाईन पूर्ववत करुन देण्यासाठी कंत्राटदाराने मनपाची परवानगी न घेता मनपाच्या नावाने पावती बुके छापली. महानगरपालिकेची परवानगी नसताना कंत्राटदार नळजोडण्या करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब कंत्राटदारानेही मान्य केली आहे. पावत्यांवरती मनपा कर्मचार्याची स्वाक्षरी असल्यामुळे यात कर्मचारी, अधिकारी यांच्यावरही संशयाची सुई आपसुकच फ़िरते आहे अशी माहिती मनपातील विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याची पाणी पुरवठा अभियंत्याने शहनिशा करुन घेतली आहे. या पावत्या बनावट असल्याचेही सांगण्यात येत आहे. मनपाची कोणत्याही स्वरुपाची पुर्वपरवानगी न घेता, नवीन पाईप लाइनवर नळजोडण्या देणे व लातूर मनपाच्या नावाने पावती बुके छापणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. एस. डी. लहाने हे स्वत: जिल्हा परिषद सदस्य असल्याचे दीपक सुळांनी सांगितले. किती पावती बुके छापली आहेत? किती पावत्या फ़ाड्ल्या गेल्या? त्यातून किती पैसे जमा केले गेले? या सर्व पावत्या मनपामध्ये जमा करून त्याची योग्य ती शहनिशा करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी केली आहे. सोमवारपर्यंत कारवाई नाही झाल्यास जन आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी मोईज शेख, दत्ता मस्के, विजयकुमार साबदे, व्यंकटेश पुरी, महेश काळे हजर होते.
Comments