लातूर: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्य़ू पवार यांच्या नावाने चांगलेच वजन प्राप्त केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार असतील अशा चर्चाही रंगू लागल्या. पवारांनी औशावर अधिक लक्ष केंद्रीत केले. ते औशातूनच लढतील अशाही चर्चा रंगू लागल्या. औशातील महत्वाच्या कामात त्यांचा सहभाग दिसू लागला. अगदी जलसंधारणाच्या कामातही त्यांनी श्रमदान केले. आता काल वेगळीच बातमी आली. औशाचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना कामाला लागा असे स्पष्ट संकेत मातोश्रीवरुन मिळाल्याचे या बातमीत म्हटले आहे. तशा बातम्या आणि फोटोही छापून आले. दिनकर माने यांच्याबाबत शिवसेना आग्रही राहिली तर अभिमन्यू पवारांचे काय ते लातुरातून लढणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. लातूर विधानसभेचे कॉंग्रेस उमेदवार स्पष्ट आहेत. पण भाजपाने संभाव्य उमेदवाराचे नाव अद्याप बाहेर येऊ दिले नाही. माने औशातून फायनल झाले तर पवारांना लातुरातून संधी मिळेल असा राजकीय होरा आहे. बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर हे गणित पक्कं ठरु शकतं असंही बोललं जात आहे. पवारांबद्दल नुसत्याच चर्चा झडायच्या पण त्याबाबत कुणी त्यांना खुलेपणाने विचारले नाही. काही दिवसांपूर्वी आजलातूरने या विषयाला तोंड फोडले. यावर त्यांची मुलाखत घेतली. मी केवळ कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला तर तो मला शिरसावंद्य आहे असे सूचक विधान केले होते. बदलत्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत आणखी एकदा येथे प्रसारित करीत आहोत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली. त्या निवडणुकीत भाजपाचे सुनील गायकवाड निवडून आले. लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांनी त्यांना आघाडी दिली होती. याही निवडणुकीत शृंगारे यांना सर्वच सहाही विधानसभा मतदारसंघांनी आघाडी दिली. मागच्या वेळी सहाही मतदारसंघांनी भाजपला आघाडी दिली असली तरी लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा मतदारसंघातून कॉंग्रेसचेच उमेदवार निवडून आले होते. हेही विसरता येणार नाही!
Comments