लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सोबतच गोपीनाथराव मुंडे यांचाही पुतळा उभारण्याचा निर्णय आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एकूण सात विषयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली अशी माहिती स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. शहरात तातडीच्या पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित नगरसेवकांच्या सूचनांप्रमाणे पूर्ण करण्याचे आदेशही गोविंदपूरकर यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.
लातूर शहर महानगरपालिकेची स्थायी समितीची आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तास कायम करण्याबरोबरच नटवर्य श्रीरामगोजमगुंडे कलारत्न पुरस्काराकरिता कलावंताची निवड करण्यासाठी समिती गठीत करणे, पुरस्काराची रक्कम पन्नास हजाराहून एक लाख रुपये करणे, लातूर शहर पाणी पुरवठा योजना वितरण व्यवस्था देखभाल व दुरुस्तीसाठी वार्षिक दर निविदा मंजुरीबाबत निर्णय घेणे, लातूर शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी रसायन पुरवठा करण्यासाठी वार्षिक दर निविदा मंजुरीबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे, लातूर शहर पाणी पुरवठा अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रासाठी रसायन पुरवठा (विरंजक चूर्ण) पुरवठा करण्यासाठी वार्षिक दर निविदा मंजुरी बाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे, लोकनेते विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी चबुतरा बांधकाम करण्यासाठी आलेल्या निविदांवर विचार विनिमय करून निर्णय घेणे, लातूर मनपा भांडार विभाग विविध विभागाच्या मागणी पत्राप्रमाणे स्टेशनरी साहित्य ई-निविदा अवलोकनार्थ सादर करणे असे विषय ठेवण्यात आले होते.
या बैठकीत लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबरोबर गोपीनाथराव मुंडे यांचाही पुतळा बसवण्यात यावा, यावरही विचारविनिमय झाला. त्यावेळी सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी मनपा प्रशासनास आपण अगोदरच गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यासाठी जागा सुचवण्याबाबत पत्र दिल्याचे सांगितले. पुढील बैठकीत हा विषय विषय पत्रिकेवर घेऊन त्याला रितसर मंजुरी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. नाना नानी पार्कमध्ये बसवण्यात येणाऱ्या लोकनेते विलासराव देशमुख यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी चबुतरा बांधकामाच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आल्याचे गोविंदपूरकर यांनी सांगितले. मनपाच्या कोंडवाड्याची निविदा तातडीने प्रकाशित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. अमृत योजनेचे काम जीवन प्राधिकरण मधील अभियंत्यांमुळे अडत असेल तर संबंधित अभियंत्यांना समज देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेण्याच्या सूचना गोविंदपूरकर यांनी दिल्या. मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बामणकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल बैठकीत अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. बामणकर यांच्या कामांची चौकशी करण्यासाठी तात्पुरती चौकशी समिती नेमून चौकशी केली जाईल असे सभापतींनी सांगितले. पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेबाबत संबंधित कंत्राटदारास शेवटची संधी द्यावी व याउपरही त्याचे काम समाधानकारक नाही झाले तर निविदा रद्द करावी असे अदेश देण्यात आले. या बैठकीत राजा मणियार, रविशंकर जाधव, विक्रांत गोजमगुंडे, शैलेश स्वामी, शैलेश गोजमगुंडे, सचिन बंडापल्ले, शीतल मालू आदी सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले.
Comments