HOME   व्हिडिओ न्यूज

औशाला माकणीचे पाणी, आठवड्यात मंजुरी- मुख्यमंत्री

अभिमन्यू पवारांच्या मागण्यांना तात्काळ प्रतिसाद, उपस्थितांनी दिला जनादेश!


औसा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या महाजनादेश यात्रेचे औसा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मागण्यांना तात्काळ प्रतिसाद देत माकणीचे पाणी आणण्यासाठी ४५ कोटी रुपयांच्या योजनेला आठवडाभरात मंजुरी देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या जंगी सभेला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावत त्यांच्यासह अभिमन्यू पवार यांनाही आपला जनादेश असल्याचे जोरदार घोषणा देत दाखवून दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात औसा येथील बस डेपोच्या मैदानावर जाहीर सभा झाली. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाध्यक्ष तथा गोदावरी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, जिपचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, यांच्यासह खा. सुधाकरराव शृंगारे, खा. विकास महात्मे, यात्रेचे निमंत्रक आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. विनायकराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, आ. सुरेश धस, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे यांच्यासह रमेशअप्पा कराड, दिलीपराव देशमुख, गणेश हाके, संताजी चालुक्य, बजरंग जाधव, किरण उटगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आपल्या जोशपूर्ण भाषणात मुख्यमंत्र्यांनी औसेकरांची मने जिंकली .औशातील वातावरण पाहून मुख्यमंत्र्यांनी औसा येथे झालेली मोदींची सभा ही सर्वात मोठी होती हे आवर्जून सांगितले. कोणतीही यात्रा ही दैवतासाठी असते. मी देखील जनतेचे दर्शन घेण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे ते म्हणाले.
औसा मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मागण्यांचा धागा पकडत जवळपास सर्व योजनांना त्यांनी मंजुरी दिली. औशासाठी लागेल तेवढा निधी देण्यास आपण तयार असल्याचे असल्याचे ते म्हणाले. औसा शहरासाठी निम्न तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यास करण्याच्या योजनेला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. ४५ कोटी रुपयांच्या या योजनेला आठवडाभरात अंतिम मंजुरी देऊ अशी घोषणा त्यांनी केली. नव्याने होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये महिला बचत गटांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणाही त्यांनी केली. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही त्यांना विमा मिळवून देण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करून पात्र शेतकर्‍यांना तात्काळ विमान मिळवून देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रारंभी बोलताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपाचे कार्यकर्ते विकास जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असल्याचे मत व्यक्त केले.
आपल्या भाषणात अभिमन्यू पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक विक्रम केले आहेत. त्यांच्याच विचाराने चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असूनही मुख्यमंत्र्यांमुळेच जनतेच्या समस्या सोडवता आल्या. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून औसा मतदारसंघासाठी 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मिळवून दिला. दुर्लक्षित असणाऱ्या औसा मतदारसंघाचा लातूरच्या बरोबरीने विकास करावयाचा आहे. यासाठी आणखी निधी लागणार आहे. नागपूर नंतर लातूर जिल्ह्यात भाजपाचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे औसा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार खात्रीने निवडून येणार असल्याचे अभिमन्यू पवार म्हणाले. यासोबतच टेंभी येथे नवीन एमआयडीसीत बचत गटांना स्टॉल साठी जागेचे आरक्षण यासह विविध मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
अभिमन्यू पवारांना जनादेश....
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी मला आशीर्वाद देणार का? असा सवाल उपस्थित जनसमुदायाला विचारला. जोरदार घोषणा देत जनतेने होकार दिला. त्यापाठोपाठ अभिमन्यू पवारांना जनादेश देणार का? असे मुख्यमंत्र्यांनी विचारले. त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळाला. उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी टाळ्या वाजवून, हात उंचावून, घोषणा देत अभिमन्यू पवार यांना जनादेश असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिमन्यू पवार यांना जनतेचा कौल मिळाला!


Comments

Top