लातूर: जुन्या लातूरमध्ये आणि नव्या लातुरातील काही भागात अरुंद रस्त्यांच्या वस्त्या आहेत. या वस्त्यातून वावरणे आतिशय कठीण होत चालले आहे. त्यातच एखाद्या घरासमोर चार चाकी वाहन पार्क झाले की सबंध रस्ता अडचणीचा ठरतो. शिवाय या भागात एखादे मोठे वाहन आले की विजेचे खांब, विजेच्या तारा, बोअरची पाईअपलाईन या सगळ्यांची वाट लागते. शिवाय छोटे मोठे अपघात सतत घडत राहतात. असाच प्रकार हत्तेनगरच्या पाचव्या गल्लीत घडला. या भागात कृष्णा बेकरीचे गोदाम आहे. या गोदामात चॉकलेट्स पोचवण्यासाठी एक ट्रक आला. ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा अधिक माल भरण्यात आला होता. हा माल एका बाजुला झुकला. ट्रक जाताना वर झुकलेल्या मालाने विजेच्या खांबाला धक्का दिला आणि खांब वाकला, तारा तुटल्या. बघता बघता नागरिक जमले आणि त्यांनी तातडीने महावितरणला कळवून वीज पुरवठा बंद केला त्यामुळे अनर्थ टळला, हत्तेनगर भागातील पाचही गल्ल्यातील रस्ते १८ ते २० फुटांचे रस्ते आहेत. यामुळे या भागात चारचाकी आणि अवजड वाहनांना वावरण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी आणि मनपाकडे करण्यात येणार आहे अशी माहिती या भागातील नागरिक ओमप्रकाश तोष्णीवाल आणि इतरांनी दिली.
Comments