लातूर: लातूर शहराच्या विकासाबाबत आजपर्यंत काय केले? लातूर शहरातील विविध विकासकामे रखडली अन त्याबाबत महापौरांचे सततचे मौन याविरोधात कॉंग्रेसच्या वतीने मनपाच्या प्रांगणामध्ये जागरण अणि गोंधळ घातला. नगरसेविका सपना किसवे आराधी-गोंधळी झाल्या होत्या. माजी उप महापौर कैलास कांबळे विदूषक झाले होते तर युनूस मोमीन यांनी पोतराजाची भूमिका बजावली.
कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कोणी विदुषक, पोतराज तर कोणी फ़किर झाले व हे सगळी प्रतिकात्मक रुपे महापौरांची असून त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी ही सोंगे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उलटी हालकी, झांज व संबळाच्या गजरात महापालिकेचा परिसर दणानून निघाला. मागण्यांचे निवेदन घेवून महापौर दालनाकडे गेले असता त्या ठिकाणी कुलुप लावलेले होते. तिथे थांबून महापौरांचा निषेध करण्यात आला. या निवेदनामधील मागण्या नागरिकांच्या जिव्हाळ्यांचा असून महापौर नसल्यामुळे त्या त्यांच्या पर्यंत पोचवायच्या कशा? महपौर हे कधीच महापालिकेत येत नाहीत असाही आरोप दीपक सूळ यांनी केला. लातूर शहरात ०८ महिन्यांपासून एकही विकास काम झाले नाही. निवडणुकीच्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनाचा विसर महापौरांना पडला आहे. लातूर शहरातील समाज मंदिरांचे काय करण्यात आले? लातूर शहरास दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा करु म्हणाले होते याचे काय झाले. शादीखानाचे दिमाखदार भुमीपुजन केले शादीखाना तयार झाला नाही. शहरातील स्मशानभूमी व दफ़नभुमीचे काय झाले. लातूर शहरास शांघाय बनविन्याचे काय झाले. लातूर शहरात होत असलेल्या अमृत योजनेतुन जी कामे होत आहेत, या कामातील कंत्राटदाराने केलेल्या कराराप्रमाणे दिलेल्या वेळेत काम पुर्ण न करता विनापरवाना पावती पुस्तके छापून घतेले व शहरातील नागरिकांकडून लाखो रुपयांची रक्कम गोळा केली. IDEA सेल्युलर कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता स्वतःच्या फ़ायद्यासाठी राजीव गांधी चौक ते कन्हेरी चौक भागात रस्ता खोदुन कामे केली आहे यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला. यामधील दोषींवर गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते आहे. या कंपन्यांमुळे लातूर महापालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते आहे. यामुळे या दोन्ही कंपन्यांवर लवकरात लवकर गुन्हा नोंद करण्य़ात यावा अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते दिपक सूळ, स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपुरकर, कांचन अजनीकर, सपना किसवे, उषा भडीकर, रुबीना तांबोळी, गौरी बागवान, शैलजा अराध्ये, दिप्ती खंडागळे, पुजा पंचाक्षरी, सोजरबाई मस्के, विजय साबदे, सचिन बंडापल्ले, पुनीत पाटील, सय्यद इम्रान, फ़रजाना बागवान, रफ़ीतबी शेख, कालीदास भगत, शेख हाकिम, अहमद पठाण, सुभाष पंचाक्षरी, शैलेष बोंदवाड गौरव काथवटे, युनुस मोमीन, कैलास कांबळे, पप्पू देशमुख आदी हजर होते.
Comments