लातूर: प्रभागातील नागरिकांचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये सहभाग वाढावा आणि ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरणाकरिता जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभाग ०५ चे नगरसेवक तथा माजी स्थायी समिति सभापती विक्रांत गोजमगुंडे आपल्या प्रभागातील नागरिकांकरीता एक अभिनव उपक्रम राबवित आहेत. या अंतर्गत नागरिकांनी सलग दहा दिवस ओला कचरा–सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीत दिल्यास नागरिकांना बाक्षिसे देण्यात येणार आहेत. दि ११ ते २५ जानेवारी याकाळात ही योजना राबविण्यात येणार आहे. विजेत्याची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ताथोडे ज्वेलर्स यांच्या वतीने सोन्याची नथ, व्दितीय पारितोषिक द्वारकादास शामकुमार यांच्या कडून पैठणी तर तृतीय पारितोषिक म्हणून चलवाड ज्वेलर्स यांच्या वतीने तीन विजेत्याना चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढ़ावा याकरिता प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रभागातील नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा देवून महानगरपालिकेस सहकार्य करावे आणि प्रभाग स्वछ व सुंदर करण्यास सहकार्य करावे व विशेषतः महिलांनी याकामी पुढाकार घ्यावा असे आवाहन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, पूजा पंचाक्षरी, डॉ फरजाना बागवान, गौरव काथवटे, स्वछता निरीक्षक मुनीर शेख़ यांनी केले आहे.
Comments