लातूर: भिमा-कोरेगाव येथे ०१ जानेवारी रोजी झालेल्या दगडफ़ेक व हिंसाचाराच्या विरोधात ०३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दलित संघटनांच्या देण्यात आली होती. या बंद दरम्यान लातूर जिल्ह्यातील निलंगा या शहरामध्येही दगडफ़ेक झाली. त्या दगडफ़ेकीमध्ये नागरिकांसमवेत काही पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकरांनी या बंद दरम्यान एका विशिष्ट समाजाच्या समुहाला दगडफ़ेकीस तसेच दंगल भडकण्याची चिथावणी दिली. आंबेडकरी अनुयायांना जातीयवाचक शिवीगाळ करून निलंगा येथील दंगल भडकावल्याचा आरोप व्हीएस पॅंथर या संघटनेने दिलेल्या निवेदनात केला आहे. याची शासनस्तरावर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. निलंग्यात दंगल भडकावणार्या जबाबदार पोलिस अधिकार्यांवर कारवाइ न झाल्यास सबंध महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल असा इशारा व्हीएस पॅंथरचे सचिव अमोल सुरवसे यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी अमोल सुरवसे, सचिन मस्के, आनंद जाधव, अमोल कांबळे, अरूण रणसुभे, असद शेख, फ़ेरोज शेख, किरण पांचाळ, महेबूब शेख, हुसेन शेख, श्रीहरी केंद्रे आदी उपस्थित होते.
Comments