HOME   व्हिडिओ न्यूज

मनपाची सभा: कुणी म्हणते वैध, कुणी अवैध, कुणी म्हणते तहकूब!

आयुक्तांचा अवमान, तीन तास अवांतर चर्चा, सभा गुंडाळली, भाजप म्हणते सगळे विषय मंजूर!


लातूर: महानगरपालिकेची सभा कशी नसावी याचं उत्तम उदाहरण आज पहायला मिळालं. स्वत: आयुक्तच सभेच्या वैधतेबद्दल साशंक होते. बिन सरकारी विषय कामकाजात घेणार नाही असं सांगत होते. त्यांना शैलेश स्वामी यांनी खाली बसायला सांगितलं. हा आयुक्तांचा अवमान आहे असं सांगत दीपक सूळ यांनी जोरदार आक्षेप घेतला. ही सभा रद्द करावी अशा आशयाचे पत्र प्रकाश पाठक यांनी दिले होते. सदस्यांना सभेबाबतची सगळी कागदपत्रे न मिळाल्यानं ही सभा पुढे ढकलावी अशी मागणी सचिन मस्के यांनी केली होती. दीपक सूळ यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत सभेच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित केले.
सभेच्या सुरुवातीला इतिवृत्ताचे वाचन होत असते तेही नीट झाले नाही. तीन तास सभा भरकटली. मूळ मुद्द्यावर यायला बराच उशीर झाला. त्यातच गौरव काथवटे यांनी आयडीया कंपनीने केलेल्या अवैध खोदकामाचा आणि परस्पर केबल टाकण्याचा विषय काढला. फक्त गुन्हा दाखल करुन गप्प बसणार असाल तर आम्ही वायरी काढून फेकू, त्यांना दंड करा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी केली. गंजगोलाईला शंभर वर्षे पूर्ण झाली, वर्ष सरुन गेले सुशोभिकरण आणि बाकीची कामे कधी करणार? असा सवाल विक्रांत गोजमगुंडे आणि गोविंदपूरकर यांनी केला. गोलाईच्या शतकपूर्तीच्या कार्यक्रमासाठी नागरी समिती गठीत करण्याचे मात्र ठरले. सभेचा एकूण नूर पाहता काही सदस्यांनी राष्ट्रगीत सुरु केले. यानुसार सभा संपली म्हणून अनेक नगरसेवक उठून गेले. नंतर भाजप सदस्यांनी पुन्हा कामकाज सुरु ठेवले आणि पुन्हा एकदा राष्ट्रगीत झाले, हा अवमान आहे असं गोविंदपूरकर म्हणतात. या सभेपुढे ठेवण्यात आलेले सहाही विषय मंजूर झाले असं शैलेश स्वामी यांनी सांगितलं. बाजुलाच महापौर बसले होते ते मात्र काहीच बोलले नाहीत. सभा बेकायदेशीर होती, ती पुढे चालली असती तर लातुरकरांचे नुकसान झाले असते, एकही विषय मंजूर झालेला नाही असं विरोधी पक्षनेते दीप सूळ सांगतात. सभा बेकायदेशीर आहे हे आयुक्त सांगत असताना त्यांना दाब दिला जातो मग सभा चालवण्यात मतलब नाही, आयुक्तांना तुम्ही दाब देणार असाल तर सभागृह चालतच नाही असं गोविंदपूरकर म्हणाले. तर सभेतले सगळे विषय मंजूर झाले असं शैलेश स्वामी यांनी आजलातूरशी बोलताना सांगितलं! शहरात अंधाराचे राज्य असल्याने कॉंग्रेसच्या सदस्यांनी महापौरांना दोन कंदील भेट देण्याचा प्रयत्न केला. ते महापौरांनी स्विकारले नाहीत पण उप महापौरांनी आपल्या जवळ ठेऊन घेतले!


Comments

Top