HOME   व्हिडिओ न्यूज

पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण, दिला विकासाचा हवाला

शानदार समारंभाला विक्रमी उपस्थिती, विविध विभागांचे चित्ररथ, गुणवंतांचा सन्मान, दिव्यांग जोडप्यांना मदत


लातूर: राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येऊन कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही २५ हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला. लातूर जिल्हयातील ०१ लाख ०५ हजार १९२ शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत २५२ कोटी ८८ लाखाचा निधी त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आलेला आहे. या कर्जमाफी मुळे मागील तीन चार वर्षात आर्थिक हालाखीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन कौशलय विकास,कामगार कल्याण,भुकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सकाळी आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमत्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, माजी खासदार रुपाताई पाटील-निलंगेकर, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) सुनील यादव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांच्या विर माता-विर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी, नागरिक, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की राज्यात ‘महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त अभियान’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प ०१ डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०१९ या कालावधीत राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात या अभियानाचे काम गतीने सुरु असल्याने लवकरच लातूर जिल्हा मोतिबिंदू मुक्त होईल. तसेच सर्व दिव्यांगांना गरजेनुसार १०० टक्के साहित्य वाटप करणे, मोतीबिंदु मुक्त व कॅन्सरमुक्त लातूर जिल्हा हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत देणार असल्याचे त्यांनी सांगून शासनाने विवेकानंद कॅन्सर हॉस्पीटलला कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केलेला आहे. तरि जिल्हयातील नागरिकांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन आपल्या परिसरातील दिव्यांग, मोतीबिंदु व कॅन्सरग्रस्त रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. विविध क्षेत्रातील गुणवंत, वीरमाता, वीरपत्नी, अवयवदान करणार्‍या किरण लोभेच्या मातोश्री, दिव्यांग जोडपे यांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सकाळी ०९.१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर निलंगेकर यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी व पत्रकार यांना निलंगेकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहीदांच्या वीरमाता-वीरपत्नी यांची भेट घेवून त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देवून सत्कार केला. या समारंभाचे सुत्र संचालन संवादतज्ञ उद्धव फड यांनी केले तर समारंभ यशस्वीतेसाठी गोविंद माने यांनी परिश्रम घेतले.


Comments

Top