लातूर: आजचा प्रजासत्ताक दिन कॉंग्रेस आणि भाजपाने हायजॅक केला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असे कार्यक्रम आज लातुरात फारसे दिसले नाहीत. कारण कुणी तिरंगा रॅलीत तर कुणी संविधान रॅलीत गुंतले होते. लातुरच्या टाऊन हॉलच्या मैदानावरुन भाजपाने तिरंगा रॅली सुरु केली. याचं उदघाटन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकता आणि समतेचा नारा दिला होता, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्ही हा विचार घेऊन पुढे निघालो आहोत. संविधानाची पूजा म्हणजे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे होय, हीच भूमिका घेऊन आम्ही चालत आहोत असे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी आजलातूरशी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे, महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, गुरुनाथ मगे, शैलेश लाहोटी, रागिणी यादव, सुनील मलवाड, मोहन माने, रवी सुडे, मंगेश बिराजदार, प्रवीण येळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली टाऊन हॉल मैदानावरुन शिवाजी चौक मार्गे, बसवेश्वर महाविद्यालय, गांधी चौक, गंजगोलाई, आंबेडकर चौक अशी निघाली. विवेकानंद चौकात रॅलीचा समारोप झाला.
Comments