लातूर: शहरातील सार्वजनिक जागांचा पुरता उपयोग, दुरुपयोग केला जात आहे. देशीकेंद्र शाळेसमोरचा उड्डाण पूल खाजगी बसचा अड्डा होऊन बसलाय तर त्यापुढचा रस्ता दुभाजक सेफ पार्किंग स्टेशन बनले आहे. याशिवाय या दुभाजकात कचरा टाकला जातो आणि खाजगी सामान टाकले जाते. बांधकामाच्या सळयाही ठेवल्या जातात. लोकनेते विलासरावांच्या काळात जुन्या रेल्वेमार्गावर रस्ता करण्यात आला, पूल बांधण्यात आला. रस्त्यात मोठे दुभाजकही उभारण्यात आले. पण या दुभाजकांचा उपयोग कचरा टाकणे आणि वाहने लावणे या पलिकडे केला गेला नाही. गणेशोत्सवात याच दुभाजकात गणेश मुर्त्यांसाठी स्टॉल्स दिले गेले, भाडेही घेतले गेले. आता या दुभाजकांचं सुशोभिकरण करायचं नसेल तर एखादा माणूस नेमून पे अॅंड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देता येऊ शकते. अन्यथा कचरा आणि फुकट पार्कींगची मनमानी अशीच चालू राहणार आहे.
Comments