HOME   व्हिडिओ न्यूज

दोन कॉफी हाऊसवर धाड, तरुण तरुणी ताब्यात

दामिनी पथकाने केली कारवाई, सतत धाडी पडूनही जैसे थे!


लातूर: लातूर शहरात कॉफी हाऊसच्या नावाखाली चालू असलेल्या भानगडी सातत्याने समोर येत आहेत. अशा प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होऊनही पुन्हा पुन्हा कॉफी हाऊसवाले या भानगडी कशा चालू ठेवतात अस प्रश्न निर्माण झाला आहे. आज गांधी चौक पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाने दोन ठिकाणी कारवाई केली. विशालनगर परिसरातील अरोमा कॉफी हाऊसमध्ये चक्क कंपार्टमेंट करण्यात आले होते. साधारणत: चारशे रुपये घेऊन तरुण तरुणींना प्रवेश दिला जायचा. अरोमात चार अल्पवयीन मुली सापडल्या. या मुलींच्या आईवडिलांना बोलाऊन समज देऊन सोडण्यात आले. यावेळी चार तरुणांनाही अटक करण्यात आली. अशा प्रकारचे कॉफी हाऊस लातूर वगळता कोठेही नाहीत असे उप विभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी सांगितले. अशा ठिकाणी कंपार्टमेंट असू नयेत, सीसीटीव्ही कॅमेरे असावेत असे ते म्हणाले.
दुसरी कारवाई शाहू कॉलेजजवळच्या खंदाडे संकुलात झाली. या ठिकाणी वरच्या मजल्यावर स्काय कॉफी शॉप चालवले जायचे. या ठिकाणीही जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी नऊ मुली आणि नऊ मुले सापडली. नऊ जणीही सज्ञान आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सज्ञान तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाया दामिनी पथकाच्या प्रमुख स्नेहा पिंपरखेडे यांनी आपल्या सहकार्‍यांसह गुप्त माहिती मिळाल्यावरुन केल्या. पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवायला हवे असे आवाहन पिंपरखेडे यांनी केले.
काही दिवसांपूर्वीच एका कारवाईची बित्तंबातमी आजलातूरने प्रसारित केली होती. ती मोठ्या प्रमाणावर पालक, शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालकांपर्यंत गेली होती. ती मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींपर्यंत व्हायरलही झाली होती. तरीही असे प्रकार वारंवार उजेडात येत आहेत.


Comments

Top