लातूर: स्वच्छ भारत मिशनमध्ये नगरसेवकांनी अधिक सक्रीय व्हावे यासाठी आणि शहरातला कचरा कुठे जातो, त्याचे पुढे काय होते, वरवंटी डेपोवर त्यापासून खत कसे तयार होते, या खताचे काय केले जाते याची माहिती नगरसेवकांना व्हावी म्हणून आयुक्त अच्युत हंगे यांनी कचरा डेपोवरच बैठक घेतली. या बैठकीला नगरसेवकांसह वरवंटी आणि नांदगावचेही लोक उपस्थित होते. सरपंच ड्नामदेव ढमालेही आपल्या सहकार्यांसह आले होते. लातूर अधिक स्वच्छ कसे होईल, स्वच्छ प्रभाग स्पर्धेसाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन चालू असतानाच सरपंच ढमाले यांनी या कचर्यामुळे या गावांची कशी वाट लागली आहे, पाणी कसे दूषित झाले आहे, विजेचा प्रश्न काय आहे वगैरे कचरा डेपोमुळे होणार्या अडचणी मांडल्या. प्रत्येक वेळी आश्वासने देतात होत काहीच नाही. आम्ही वारंवार मनपाच्या अधिकार्यांना भेटतो पण हा प्रश्न सुटत नाही असे त्यांनी सांगितले. या कचरा डेपोमुळे शेतकरी हैराण आहेत हेही सांगितले. तेव्हा आयुक्त हंगे यांनी त्यांना भिकारी म्हटले. भिकार्यासारखे वागू नका, सोमवारी पालिकेत या बैठकीत सगळे प्रश्न मार्गी लावू असे सुनावले. आयुक्तांनी भिकारी म्हणून केलेला अवमान, त्याचा घाव शेतकर्यांच्या वर्मी बसला असून वरवंटीचा रस्ता बंद केल्यावर कोण भिकारी आहे ते कळेल, आम्ही आंदोलन केल्यावर त्याचे उत्तर मिळेल असा इशारा दिला आहे. दरम्यान आयुक्त बोलून गेले, पण त्यांची बाजू विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी सावरुन घेतली. आयुक्तांच्या बोलण्याचा रोख तसा नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न केला. कचरा डेपोवरील लॅंड फिल साईटच्या भल्या मोठ्या खड्ड्यात शामियाना उभारण्यात आला होता. त्यात ही बैठक पार पडली.
Comments