HOME   व्हिडिओ न्यूज

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री अनुकूल

मात्र, सरकारवर दबाव आणणे गरजेचे- जलसंधारण मंत्री राम शिंदे


लातूर: राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत. पण, आईसुद्धा आपल्या मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नसते. ही बाब लक्षात घेऊन धनगर समाजबांधवांनी आरक्षण व समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्रीमती संगीता धायगुडे होत्या.
लातूरच्या टाऊन हॉलच्या प्रांगणावर उभारण्यात आलेल्या महाराजा यशवंतराव होळकर साहित्य नगरीमध्ये धनगर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, प्राचार्य नागनाथराव मोटे, प्राचार्य डॉ. सुरेशराव वाघमारे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संयोजक प्रा. सुभाष भिंगे, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय सोनवणी, भाऊसाहेब हाके पाटील, संभाजी सूळ, समन्वयक संजय चोरमले, अमोल पांढरे, अशोक चिंचोले, बाळकृष्ण धायगुडे, श्रीरंग शेवाळे, मंचकराव डोणे, राजपाल भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, राम मनोहर लोहिया, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले.
यावेळी आपले विचार व्यक्त करतांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाज साहित्य क्षेत्रांशी जोडला गेला असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या संमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा सफल प्रयत्न केला जाऊ शकतो. आपण सरकारच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न निश्चित करू. राज्यातील विद्यमान सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय स्तरांवर साजरी केली जात आहे. धनगर समाजाचे आरक्षण, सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा विषय कोणताही संघर्ष न करता सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला समाज मागच्या ७० वर्षात आरक्षणापासून दूर राहिला आहे. बौद्धिक क्षमतेच्या बळावर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. मात्र, समस्येच्या, प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जनतेचा समाज संघटनेचा किती दबाव आहे, हेही पाहिले जाते. आपल्या समाजायच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास मुख्यमंत्री अनुकूल आहेत. परंतु त्यासाठी जनतेच्या रेट्याचीही आवश्यकता असते, हे समाजाचा मंत्री म्हणून मी आपणास सांगू इच्छितो, असेही राम शिंदे यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वमान्य निर्णय व्हावेत असे प्रगल्भ विचार मिळावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलताना ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपल्या मार्गदर्शनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर यांनी तत्कालीन साहित्यिकांना आपले कर्तव्य समजून सर्वतोपरी सहकार्य केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. आजघडीला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी निर्माण करा, त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव निश्चित करून द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाही,असे सांगून पाण्याच्या क्षेत्रात सगळ्यात मोठे, महान कार्य अहिल्यादेवी होळकरांनी दूरदृष्टी ठेवून केले होते. साहित्यिकांना सहकार्य करण्याची परंपरा अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर, शिवाजी महाराजांनीही कायम जोपासली. साहित्य कोण्या एका जाती, धर्मापुरते बांधील नसते. सकळ मानव समाजाच्या उत्कर्षाचे काम साहित्याच्या माध्यमातून साधले जाते. साहित्यिक, साहित्याला जाती - पातीचे बंधन नसत. जात हे स्वतःपुरती मर्यादित असते हे सांगून महानोर यांनी आपण साहित्यामुळेच सगळ्यांचे होऊ शकलो असे सांगितले.
आपल्या मार्गदर्शनात ना. धों. महानोर यांनी लातुरात १९६८ साली पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण सांगितली. त्यावेळी लातूर नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून शिवराज पाटील चाकूरकर कार्यरत होते. त्याकाळी लातूरकरांकडून मिळालेल्या टाळ्या व पाठीवरील कौतुकाची थाप आपण अद्यापपर्यंत विसरू शकलो नसल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्यिकांच्या दुनियेत अध्यक्षपदासाठी होणाऱ्या प्रकारांना आपला पूर्वीपासूनच ठाम विरोध राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेला खऱ्या अर्थाने समृद्धी मिळते अशा प्रकारच्या व्यासपिठावरून सर्वंकष चर्चा व्हायला हवी. मराठी साहित्याचे संवर्धन व्हायला हवे, असे सांगून महानोर यांनी या संमेलनाच्या सुरेख नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.
साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय सोनवणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बिघडत चाललेल्या संस्कृतीला सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. धनगर समाजातही मोठ्या प्रमाणावर प्रतिभावंत कवी, साहित्यिक आहेत. पण ते विखुरले गेले आहेत. अशा संमेलनाच्या माध्यमातून ते एकत्रित येऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करू शकतात. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वैचारिक शक्तीचे ऊर्जा केंद्र निर्माण होते. संमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वच घटकापर्यंत पोहचवला जाणारा विचार महत्वाचा आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आपणास मिळणारी पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम आपण धनगर समाज संदर्भ ग्रंथ डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगून सोनवणी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे संगीता धायगुडे यांच्याकडे सुपूर्द केली. या साहित्य संमेलनाचे प्रास्तविक प्रा. सुभाष भिंगे यांनी केले. जयसिंगतात्या शेंडगे यांनी आपल्या मार्गदर्शनात साहित्य परिषदेच्या वतीने घेतले जाणारे हे दुसरेच साहित्य संमेलन आहे. भविष्यात या संमेलनाचा अश्व चौफेर उधळेल, असे त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी स्वागताध्यक्षपर विचार मांडले. यावेळी ना. धो. महानोर यांना कवी कालिदास जीवनगौरव पुरस्कार तर संजय सोनवणी यांना राजा हाल सातवाहन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये , शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे होते.
संमेलनात सौ. मीना निळकंठराव आग्रहारकर पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल, प्रगती खांडेकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल, कु. संस्कृती गजेंद्र सोनटक्के हिला अबॅकस मध्ये जगात तिसरी आल्याबद्दल, भाऊसाहेब हाके पाटील यांना इस्रो या संस्थेत केलेल्या कार्याबद्दल, डॉ. आर.डी. शेंडगे, श्रीरंग शेवाळे यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल तर बाळकृष्ण धायगुडे यांना नाट्यक्षेत्रातील कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संजय चोरमले यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप संगीता धायगुडे यांनी केला. यावेळी संगीता धायगुडे यांच्या हुमान आत्मचरित्राच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. धम्मपाल माशाळकर यांच्या लोकमाता अहिल्यादेवी, पत्रकार उज्वलकुमार माने यांच्या रणरागिणी अहिल्यादेवी या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, माजी आमदार विजय मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Comments

Top