लातूर: आज बीड्मध्ये शेतकरी संघटनेचा आक्रोश मेळावा होत आहे, त्या सोबतच मुख्यमंत्र्यांचाही स्वतंत्र कार्यक्रम आहे. शेतकरी संघटनेचा कार्यक्रम होऊ नये यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. संघटनेचे बॅनर हटवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांना एक आणि शेतकरी संघटनेला वेगळा न्याय दिला जात आहे. भाजप नेत्यांना एवढी खुमखुमी आली असेल तर त्यांनी मैदानात यावं आम्ही दोन हात करु असं आव्हान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी लातुरात दिलं. अयोग्य वेळी पाऊस, दुबार तिबार पेरण्या, परतीच्या पावसाने केलेले नुकसान त्यात बोंडअळी आणि किडीचा प्रादुर्भाव आणि आता झालेली गारपीट यामुळे मराठवाड्यातला शेतकरी उध्वस्त झाला आहे. काल सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. जिरायती शेतीला एकरी १५ तर बागायती शेतीला एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यायला हवी असे शेट्टी म्हणाले.
आपले एक सहकारी सरकारात आहेत, त्यांना शेतकर्यांचे प्रश्न दिसत नाहीत का? असा प्रश्न विचारला असता त्यांना शेतकर्यांचे सगळे प्रश्न सुटले असं वाटतं, शेतकरी आनंदात आहे असं त्यांना वाटतं, सरकारने शेतकर्यंना प्रचंड मदत केली आहे असं त्यांना वाटतं असं शेट्टी सदाभाऊ खोत यांच्याबद्दल म्हणाले.
Comments