लातूर: छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकास पोहचवावा हा आदर्श त्यांनीच घालून दिला असून त्यांच्या या आदर्शाला लौकीक अशी विश्वविक्रमी रांगोळी लातूरात साकारण्यात येत आहे. या रांगोळीच्या माध्यमातून लातूरचा संपूर्ण जगभरात नावलौकिक होईल असा विश्वास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानावर शिवमहोत्सव समितीच्या वतीने व मंगेश निपाणीकर यांच्या संकल्पनेतून तब्बल अडीच एकर जागेवर छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली गेली आहे. या रांगोळीचे उद्घाटन पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मिलिंद लातूरे, रामचंद्र तिरुके, बजरंग जाधव, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, महापौर सुरेश पवार, मनपा गटनेते तथा शिवमहोत्सव समितीचे शैलेश गोजमगुंडे, ज्ञानेश्वर चेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिवमहोत्सव समितीचे ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी लोप पावत असलेल्या या कलेला राजाश्रय पालकमंत्री निलंगेकर यांच्या माध्यमातून मिळाला असून या रांगोळीमुळे लातूरकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल असे स्पष्ट केले. या प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर यांचा शिवमहोत्सव समिती व प्रभाग क्र. १५ च्या वतीने शाल, श्रीफळ व तलवार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोपी साठे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर चेवले यांनी केले. हा विश्व विक्रम साकारण्यासाठी शिवमहोत्सव समितीच्या वैशाली यादव, गणेश गोमचाळे, नंदकिशोर जाजू, अभिनव भोसले, नितीन कडकंची, चंद्रकांत साबदे , मयुरेश उपाडे यांच्यासह अनेक जण परिश्रम घेत आहेत. ही रांगोळी साकारण्यासाठी दिनेश लोखंडे व शिवाजी हांडे या कला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Comments