HOME   व्हिडिओ न्यूज

१०० विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय अन क्रीडा साहित्य

मुद्रा फाऊंडेशनने दिला आधार, भविष्यातही देणार मदतीचा हात


लातूर: देणारे हजारो असतात पण घेणारा गरजू पाहिजे आणि त्याला देणारा ओळखता आला पाहिजे, त्याची कदर ठेवली पाहिजे. आज शैक्षणिक क्षेत्रात तर खूप मोठी पोकळी आहे. अनेकांना हवं ते शिक्षण पूर्ण करता येत नाही. पण गरजेच्या काळात मुद्रा फाऊंडेशनसारख्या सामाजिक संस्था पुढे आल्या तर अनेकांना आधार मिळतो. असाच आधार आज जानवळच्या १०० विद्यार्थ्यांना मिळाला. येथील कै. जनार्धन राजमाने निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थांना मुद्रा फाऊंडेशन लातूर या संस्थेच्या मार्फत १०० शाळकरी मुला-मुलींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. याच सोबत शालेय साहित्य, क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी खास भोजनाचीही सोय करण्यात आली होती. पाहुण्यांसोबत विद्यार्थ्यांनी सहभोजन घेतले.
या आश्रम शाळेस बर्‍याचशा लोकांनी भेट दिली पण मुद्रा फाऊंडेशन या संस्थेकडे आम्ही गेलोही नव्हतो तेच आमच्या संस्थेस शोधत आले. त्यांनी या मागासवर्गीय विद्यार्थांवर प्रेम दाखवले आहे असे गौरवोद्गार निलेश राजमाने यांनी काढले. आपणही काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेमधून आम्ही हे सर्व साहित्य दिलेले आहे. केवळ सामाजिक भावनेतून आम्ही ही मदत केली, यात कसलेही राजकारण किंवा स्वार्थ नाही. अनेकांना काहीतरी करायचे असते पण मार्ग मिळत नाही. आम्ही मित्रांनी मिळून या व्यासपिठाद्वारे हा उपक्रम घडवून आणला असे महेश घोडके यांनी सांगितले. या शाळेतील विद्यार्थांना भविष्यात कुठल्याही स्वरुपाची शैक्षणिक अडचण भासल्यास ही संस्था खंबीरपणे विद्यार्थांच्या मागे उभी राहील अशी ग्वाही कुणाल धुंगारडेंनी दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद लातूरचे तहसिलदार संजय वारकड यांनी भूषवले होते. प्रमुख पाहुणे पत्रकार ईस्माइल शेख, मुद्रा फाऊंडेशनचे महेश घोडके, समीर पिसके, विनोद साळुंके, ऋषिकेश पाटील, कृष्णा श्रंगारे, तानाजी साळुंके, मंगेश जाधव, कुणाल वागज, हेमंत पाटील उपस्थित होते.


Comments

Top