लातूर: मनपा होऊन पाच वर्षे झाली पण शिस्त नाही, कुठल्याही प्रवर्गातील कर्मचारी कुठल्याही खुर्चीचा कारभार सांभाळतात, कुवत नसलेल्या कर्मचार्यांना दोन दोन विभागांचा पदभार दिला जातो, कर्मचार्यांना मूळ नियुक्तीच्या जागेऐवजी दुसर्याच ठिकाणची जबाबदारी दिली जाते. वसुलीसाठी क्षमता नसलेले कर्मचारी पाठवले जातात, वशिल्यावर नियुक्त्या केल्या जातात. शहरात अस्वच्छता वाढली आहे, भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढली आहे. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत अशा आशयाचे निवेदन आज लातुरच्या आम आदमी पार्टीने दिले. मनपातील उच्च पदस्थातील लेखाधिकारी भिसे हजर होते. त्यांनी ते निवेदन स्विकारले.
बेकायदेशीर टेबल सांभाळणार्या कर्मचार्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवावे, अवैधरित्या पदोन्नती वेतनश्रेणी मिळवणार्यांची चौकशी करुन चुकीच्या पद्धतीने मिळवलेले लाभ वसूल करावेत, मनपातील सर्वच अधिकारी-कर्मचार्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी अशा मागण्या आपने केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा आपने दिला आहे. यावेळी दीपक कानेकर, बाळ होळीकर, अजिंक्य शिंदे, हरी गोटेकर, अमित पांडे, आनंदा कामगुंडा, नितीन चालक, योगिराज हल्लाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
Comments