लातूर: नव्याने लावण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात न्यायालयात जाणार असून जनतेनेही आपल्यासोबत यावे, याबाबतचे मार्गदर्शन आणि खर्चही व्ही मित्रमंडळ करणार आहे अशी माहिती प्रसिद्ध विधिज्ञ व्यंकटराव बेद्रे यांनी दिली. मालमत्ता कराच्या फेरमुल्यांकनावरचे आक्षेप लातूर महानगरपालिकेने मागविले होते. हे आक्षेप नोंदवण्याची अंतीम तारीख ११ डिसेंबर होती. त्यात ७२०० इतक्या नागरिकांनी आपले आक्षेप महानगरपालिकेमध्ये नोंदवले होते. यामध्ये कुठल्याही स्वरुपाची दर निश्चीती धोरण मनपाने राबविले नाही तर कोणत्या आधारावर कर आकारणी करण्यात आली आहे असा सवाल अॅड. व्यंकट बेद्रे यांनी उपस्थित केला. ही करवाढ अवाजवी स्वरुपाची आहे. करवाढ रितसर करून घेण्यासाठी जनआंदोलने केली, धरणे आंदोलन केले त्यावेळी महापौरांनी शब्द दिला होता की महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून योग्य ती कारवाई करू. पण सर्वसाधारण सभेत हा विषय मांडला गेला नाही. किंवा स्थायी समितीमध्ये यावरती काहीही निर्णय घेण्यात आला नाही. मालमत्ताधारकांना न्याय मिळाला नाही यामुळे व्ही मित्र मंडळ याविरुद्ध दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहे अशा प्रकारे ज्या नागरिकांना दाद मागायची असेल त्यांनी मित्रमंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन अॅड. बेद्रे यांनी केले आहे. या पत्रपरिषदेच्या वेळी अॅड. प्रदिप गंगणे, एजाज शेख, विश्वास कुलकर्णी, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लक्ष्मीकांत मंठाळे अप्पा उपस्थित होते.
Comments