लातूर: लातुरचं आणि पाण्याचं काय वाकडं आहे कळत नाही. ऐन रंगपंचमीच्या तोंडावर महावितरणनं थकलेल्या बिलापोटी पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा तोडला आहे. आता आज रंगलेल्या लातुरकरांनी रंग कसे धुवून काढायचे असा विचित्र प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्ष असताना लातुरकरांनी भीषण पाणी टंचाई सहन केली होती. पंधरा दिवसाला एकदा पाणी यायचं. त्यानंतर थेट २०१६ मध्ये त्याहीपेक्षा भीषण दुष्काळ पाहिला. पाण्यासाठी जमावबंदी करावी लागली, पोलिस बंदोबस्त लावावा लागला, रेल्वेनं पाणी आणावं लागलं. टॅंकरच्या आवाजानंही आपण घराबाहेर धाव घेऊ लागलो. पाण्यासाठी अनेक भांडणं पाहिली. अनेकांनी इकडून तिकडून पाणी आणून वाटपही केलं. टॅंकरमधल्या आणि अंगणात ठेवलेल्या पाण्याचीही चोरी होऊ लागली. पुढे चांगल्या पावसाने दिलासा दिला. सारेच दुष्काळाची आठवण ठेऊन पाणी वापरतील असं वाटलं पण लातुरकर फार लवकर दुष्काळ विसरुन गेले. मागच्या वर्षी आणि आजही पाण्याची प्रचंड नासाडी झाली. आज चौकाचौकात रंगासोबत पाणीही नासवले गेले. आता नेमकं रंगपंचमीच्या तोंडावर महावितरणनं पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा तोडला. पाणी असून पुन्हा टंचाईचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर लोकांशी चर्चा केली. पाण्याची ही उधळण परवडेल का असा प्रश्न केला तेव्हा एक महाशय म्हणाले ‘वर्षातून एखाद्या दिवशी सर्वांच्या आनंदासाठी पाणी वाया गेलं तर काय होतं?’
Comments