HOME   व्हिडिओ न्यूज

शिऊरच्या तावरजा नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा सुरु

तक्रार देऊनही उपयोग होईना, शेती आणि जलसंवर्धनाचे नुकसान, थांबवण्याची मागणी


लातूर: लातूर तालुक्यातील शिऊर येथील तावरजा नदीपात्रातून दररोज किमान ३० ब्रास वाळुचा बेकायदा उपसा केला जात आहे. हा उपसा असाच सुरु राहिल्यास नदीपात्रातील पाणी मुरणार नाही. परिणामी या भागातील शेतकरी आणि गावकर्‍यांचे मोठे नुकसान होईल. या प्रकरणी तक्रारही करण्यात आली होती. तलाठ्यांनी पंचनामाही केला होता पण हा उपसा असाच सुरु आहे अशा आशयाची तक्रार अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, पांडुरंग नरसिंग सूर्यवंशी आणि भिमाशंकर केरबा सूर्यवंशी आणि ग्रामस्थांनी केली आहे. याच्या प्रती तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांना देण्य़ात आल्या आहेत.
शेतकरी विकास समिती आणि आर्ट लिव्हिंगने पुढाकार घेऊन शिउरच्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले होते. यासाठी लोकसहभाग घेऊन लोकवर्गणीही जमवण्यात आली होती. या अवैध वाळू उपशाबाबत तलाठी श्रीमती पुरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी काहीच कारवाई केली नाही. नंतर तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली त्यांनी या सर्वांना थोडाफार दंड आकारण्याचे आदेश दिले. पुन्हा वाळू उपसा तसाच चालू राहिला असे ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि गावकर्‍यांचे म्हणणे आहे. हा उपसा रात्रीतून केला जातो. त्यामुळे नदीकाठच्या शेतीचे आणि जलसंधारणाचे नुकसान होत आहे. या प्रकरणी लक्ष घालून हा प्रकार थांबवावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


Comments

Top