लातूर: मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही तूर खरेदीचे वांदे झाले आहेत. यंदा त्यात हरभर्याची भर पडली आहे. बारदाना नाही, साठवणुकीला जागा नाही. असा नन्नाचा पाढा सुरु आहे. पण सरकारने तूर आणि हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्यास संमती दिली आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघेल अशी माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ते पत्रकार परिषदेनंतर आजलातूरशी बोलत होते.
तूर खरेदीची मुदत संपली आहे. हरभरा खरेदीची मुदत संपत आली आहे. असे असताना तूर आणि हरभरा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. तूर खरेदीला अजून मुदतवाढ हवी अशी शेतकर्यांची मागणी आहे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. पणन मंत्री सुभाष देशमुख आणि मी केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटलो. दोन तीन दिवसात तूर खरेदीला मुदतवाढ देण्याचा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. दोन दिवसात हरभरा खरेदीची मुदत संपणार आहे. पण केवळ बारदाना उपलब्ध नसल्याने ज्या प्रमाणात हरभरा खरेदी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. केंद्राने हरभरा खरेदीलाही मुदतवाढ देण्याबाबत संमती दर्शवली आहे. जागा आणि बारदान्याची अडचण होती. १५ लाख बारदाना सरकार उपलब्ध करुन देत आहे. शिवाय दीड लाख टन हरभरा, तूर साठवण्याची जागाही उपलब्ध झाली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात उर्वरीत तूर आणि हरभराही खरेदी केला जाईल असे पाशा पटेल यांनी सांगितले.
Comments