लातूर: नऊ संघटनांचे सुमारे दहा लाख बॅंक कर्मचारी आज देशव्यापी संपात उतरले. लातुरात या कर्मचार्यांनी मोर्चा काढला आणि शाहू महाविद्यालयाजवळील एसबीआय बॅंकेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. या कर्मचार्यांनी बॅंकांना मोठा नफा मिळवून देऊनही केवळ दोन टक्के वेतनवाढ केली याचा निषेध या कर्मचार्यांनी केला. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला न देता त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले. आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप, दीपरत्न निलंगेकर, बाळ होळीकर, हनमंत गायकवाड यांनी ही निवेदने स्विकारली. बॅंक कर्मचार्यांचे नेते धनंजय कुलकर्णी, उत्तम होळीकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
बॅंक कर्मचार्यांनी या देशातल्या अर्थव्यवस्थेला आकार दिला. पण मोठ्या लोकांचे कर्ज मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. सत्तेत बसलेल्या काही लोकांनी केलेली लूट आहे. पण सामान्य माणसाला वेगवेगळ्या करातून नागवले जात आहे. जाणून बुजून सरकार बॅंक कर्मचार्यांवरही अन्याय करीत आहे, सरकारने जणू हे आव्हानच दिले आहे असाही आरोप धनंजय कुलकर्णी यांनी केला. दोन दिवस बॅंका बंद राहणार असल्याने देशभरातील उलाढालींवर विपरीत परिणाम होत आहे.
Comments