लातूर: विशेष रस्ता अनुदान योजना व मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत प्राप्त १५ कोटींच्या निधी वाटपाची यादी वाचून दाखवावी, अशी जोरदार मागणी कॉंग्रेस नगरसेवकांनी केली. दरम्यान, गोंधळ उडाल्याने महापौरांनी अर्धा तास सभा तहकूब केली. त्यानंतर सत्ताधार्यांनी निधी वाटपाच्या यादीस मंजुरी दिली, परंतु त्यावर कॉंग्रेस नगरसेवकांनी आपला आक्षेप कायम ठेवला. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षातेखाली गुरूवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमहापौर देविदास काळे, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची उपस्थिती होती. कातपूर साठवण तलाव महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा विषय सुरु झाल्यानंतर त्यावर विरोधी पक्षनेते अॅड. दीपक सूळ, कॉंग्रेसचे अशोक गोविंदपूरकर, विक्रांत गोजमगुंडे यांनी आक्षेप घेत तलावाच्या खालील बाजूची जागा मलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खरेदी करायची आहे की तलावाचा परिसर पर्यटन स्थळासाठी हस्तांतरीत करायचा आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली. त्यावर जोरदार चर्चा झाली. तेव्हा महापौर पवार यांनी तलाव हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा खरेदी करायची असल्याचे स्प्ष्ट केले. जागा खरेदीस कॉंग्रेसने विरोध दर्शविला.
Comments