HOME   लातूर न्यूज

बाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची लागवड

वैशालीताई देशमुख यांच्या प्रयत्नातून आधुनिक पध्दतीने शेती करण्याकडे वाटचाल


बाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची लागवड

लातूर: आपल्या देशातील कृषी संशोधन क्षेत्रात दररोज नवनवीन संशोधन होत आहेत. आधुनिक पध्दतीने शेती करुन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याबाबत हे संशोधन उपयुक्त ठरत आहेत. हे संशोधन लातूरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचले पाहिजे, असा प्रयत्न विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बाभळगाव येथील त्यांच्याच शेतामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत ऊस रोप लागवड यंत्राने (प्लांटर) प्रायोगिक करण्यात आली.
प्लांटरने ऊस लागवड करण्यासाठी जमीन नांगरुन, रोटावेटर करुन जमीन भुसभुसीत करावी लागते. जमिनीची चांगली मशागत झाल्यानंतर २५ ते ४५ दिवसांची ऊसाची रोपे घेऊन ती रोपे ट्रक्टरची मदत घेऊन प्लांटरद्वारे पाच फूट, सहा फूट, दोन ओळीतील अंतर शेतकऱ्यांच्या निवडीनुसार आणि दोन रोपांमधील अंतर एक फूट, सव्वा फूट किंवा त्यापेक्षा जास्त मागणीनुसार अॅडजेस्टमेंट करता येते. प्लांटरने ८ तासांत ३ ते ५ एकर ऊस लागवड करता येते. मनुष्यबळाने ऊस लागवड केली तर एकरी एक दिवस लागतो. प्लांटरने ऊस लागवड केली तर चार ते पाच दिवस वाचतात आणि होणारा मोठा खर्च कमी होतो. प्लांटरने ऊस लागवड केली तर ऊसाची लागवड लवकर होते. प्लांटरने ऊस लागवड करीत असतानाच सबसर्फेस ठिबक व सर्फेस ठिबक करता येते. प्लांटरने ऊस लागवडीचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातील महत्त्वांचे फायदे म्हणजे रोप योग्य अंतरावर पडते, योग्य खोलीवर जाते, ऊसाची वाढ समान होते, रोपांची तूट कमी होते. मनुष्यबळाचा वापर करुन ऊस लागवड केल्यानंतर ऊसाच्या उगवणीला ३० दिवस लागतात. त्या उलट फाउंडेशन बेण्यांपासुन तयार केलेल्या उसाची रोपे प्लांटने लावली तर एक महिन्याआधी लागवडीची नोंद साखर कारखान्यांकडे होते. त्यामुळे ऊस तोडीचा प्रोग्राम त्यानुसार लागतो. प्लांटरने वेळेत ऊस लागवड होत असल्याने ऊस तोडही वेळेतच होते. परिणामी वेळ, जास्तीचे श्रम आणि खर्चही वाचतो. अत्याधुनिक पध्दतीने शेती करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, या दृष्टीने श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन बाभळगाव येथील त्यांच्या शेतात प्लांटरद्वारे प्रायोगिक तत्त्वावर ऊस लागवड करण्यात आली.
लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, विजय देशमुख, संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, अनंत बारबोले, रमेश थोरमोटे, भारत आदमाने, कार्यकारी संचालक समीर सलगर, विलास को. ऑपरेटिव्ह बँकचे व्हा. चेअरमन चंद्रकांत देवकते, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, नेटाफेमचे संदीप तांदळे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे सचिन डिग्रसे, सातारा येथील जयदेव बर्वे, डॉ.साळुंके, बादल शेख, प्रशांत घार आदी उपस्थित होते.


Comments

Top