HOME   लातूर न्यूज

औशाच्या आमदाराने मांडले उप मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न

जिल्हा वार्षिक योजना बैठकीस आ. अभिमन्यू पवार यांची बैठकीस उपस्थिती


औशाच्या आमदाराने मांडले उप मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न

औसा: राज्याचे उप मुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२०-२१ करिता प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी औरंगाबाद येथे बैठक झाली. या बैठकीस उपस्थित राहून आ. अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातील विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडत निधीची तरतूद करण्याची मागणी केली. या बैठकीला आ. संजय बनसोडे, विक्रम काळे हेही उपस्थित होते. त्यांनीही समस्या मांडल्या.
या बैठकीत मतदारसंघातील शेतीसाठीचे ६३ केव्हीए चे ट्रांन्सफार्मर बदलून त्याजागी १०० केव्हीए चे ट्रांन्सफार्मर लावावे अशी विनंती आ. पवार यांनी उप मुख्यमंत्री महोदयांना केली.
अनेक गावांमध्ये चांगले शेत व पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकरी बांधवांना रोजच त्रास सहन करावा लागतो. पालकमंत्री पाणंद रस्ते योजना अंतर्गत निधीच्या कमतरतेमुळे शेतरस्त्यांची कामे मंजूर होत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री शेत- पाणंद रस्ते योजना अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी,मजबुतीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत भरीव निधीची तरतूद करावी तसेच त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली .
आजही अनेक गावांमध्ये सार्वजनिक स्मशानभूमी नाही. अल्प निधीच्या तरतुदीमुळे स्मशानभूमीसाठी भूसंपादन तसेच बांधकाम करण्यासाठी अडचणी येतात आणि मूळ समस्या तशाच राहतात. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत सार्वजनिक स्मशानभूमीच्या भूसंपादन व बांधकामासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
गावे प्रदुषण विरहित राहण्यासाठी आणि तापमान कमी करण्यासाठी ‘एक दार, एक झाड’ योजना आखली पाहिजे. या सर्व मागण्यांबाबत उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी दिली.


Comments

Top