लातूर: ०६ जानेवारी सोमवार रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. पक्ष एकसंध असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापतींची निवड सर्वानुमते, एकमताने होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे निरीक्षक रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली. निरीक्षक म्हणून सर्व सदस्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना दानवे पाटील म्हणाले की, निरीक्षक म्हणून येथे आल्यानंतर आपण कोअर कमिटीसोबत चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. आज लातूर जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात आहे. यापुढेही ती भाजपाच्याच ताब्यात राहील. राज्यात कोणाचेही सरकार आले तरी त्याचा परिणाम जिल्हा परिषदेवर होणार नाही, असेही ते म्हणाले.
मागील अडीच वर्षात लातूर जिल्हा परिषदेने चांगले काम केलेले आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना आता संधी मिळणार आहे त्यांच्या नेतृत्वात पुढील निवडणुका होणार आहेत. सर्व पदावर योग्य व्यक्तींनाच संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले .नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीत काही मते फुटल्या संदर्भात ते म्हणाले की, ज्यांनी विरोधकांना साथ दिली त्यांच्यावर पक्षाकडून लवकरच कारवाई केली जाईल. यासंबंधीचे अहवाल मागविण्यात आले असून प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील सत्ता गेली तरी पक्षातील नेते बाहेर जाणार नाहीत. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असेही दानवे पाटील यांनी सांगितले.
कार्निवल हॉटेलात झालेल्या या बैठकीसाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना कॅमेरे घेऊन या असा निरोप होता. पण कुणालाही चित्रीकरण करु दिले गेले नाही. दानवेंनीही कॅमेर्यासमोर बोलण्यास नकार दिला.
Comments