HOME   लातूर न्यूज

ताणाचे व्यवस्थापन केल्यास यश मिळते

दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत मानसोपचार तज्ञ डॉ. मिलिंद पोतदार


ताणाचे व्यवस्थापन केल्यास यश मिळते

लातूर: प्रत्येक व्यक्तीला जीवनात ताण तणावाला सामोरे जावे लागत असते. जो व्यक्ती ताण-तणावाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करतो तोच व्यक्ती जीवनात यशस्वी होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर मिलिंद पोतदार यांनी केले. दर्पण दिनाच्या निमित्ताने सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च सेंटर येथील सभागृहात आयोजित मानसिक ताणतणाव व्यवस्थापनाची एबीसीडी या विषयावरील व्याख्यानात डॉक्टर पोतदार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी, सचिव दत्तात्रय परळकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक व अन्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पोतदार पुढे म्हणाले की, ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास माणसाला यश मिळू शकते त्याकरिता सकारात्मक व नकारात्मक भावनांचे योग्य ताळमेळ घातला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सहा प्रकारच्या भावना माणसांना असतात. त्यातील योग्य वेळी योग्य भावनांचा उपयोग करून तणावाचे व्यवस्थापन केले जाऊ शकतं असे त्यांनी स्पष्ट केले.
तणावाचे व्यवस्थापन हे व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने मार्ग निवडावा. तसेच कोणतारी एक छंद जोपासावा व त्याच्यामध्ये आपला वेळ व्यतीत करावा, त्यातून एक मानसिक समाधान मिळते. त्याप्रमाणेच रोज काहीतरी एक चांगले काम करण्याचा संकल्प करावा त्यातून येईल प्रकारचा आनंद मिळतो, सकारात्मक ऊर्जा तयार होते. एखाद्याला निस्वार्थपणे मदत करणे अशा गोष्टी केल्यास तणावाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता येते अशी माहिती डॉक्टर पोतदार यांनी दिली. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री भंडारे म्हणाले, की आपण रोजचे वृत्तपत्र सकाळी पाहिले तर नकारात्मक बातम्याच आपल्या दृष्टीस पडतात. त्यामुळे वृत्तपत्रांनी सकारात्मक वृत्तांना हे महत्त्व दिले पाहिजे व उपेक्षित घटकांसाठी चांगले काम केल्यास आनंद नक्कीच मिळतो असे त्यांनी सांगून प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव असतोच पण त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी मध्यममार्गी भूमिका स्वीकारली गेली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले व सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


Comments

Top