HOME   लातूर न्यूज

लातूर महापालिकेत प्रथमच स्वतंत्र महिला कक्ष

महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचा पुढाकार


लातूर महापालिकेत प्रथमच स्वतंत्र महिला कक्ष

लातूर: महापालिकेत पुरुष नगरसेवकांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष असावा ही अनेक दिवसांपासून असणारी मागणी सोमवारी पूर्ण झाली. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या पुढाकारातून पालिकेत नगरसेविकांसाठी अद्ययावत अशा स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली असुन सोमवारी या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले.
महापालिकेत महिला आणि पुरुष नगरसेवकांची संख्या सारखीच आहे. परंतु सर्वसाधारण सभा आणि इतर वेळी पालिकेत येणाऱ्या नगरसेविकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष अथवा कसलीही सोय नव्हती. त्यामुळे नगरसेविकांना विविध कामांसाठी पालिकेत आल्यानंतर सभापतींची दालने अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसावे लागत होते. महिला सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष असावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. परंतु आजवर त्याकडे दुर्लक्ष केले होते.
विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारताच या विषयात लक्ष घालत आपल्या महिला सहकाऱ्यांची ही अडचण दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
सोमवारी या कक्षाचे लोकार्पण ज्येष्ठ महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व सोयींनी युक्त अशा या कक्षात स्वतंत्र स्वच्छतागृह, वीज उपकरणे, आसनव्यवस्था तसेच सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशिनही बसवण्यात आली आहे. महिला सदस्यांना आता विविध कामांसाठी पालिकेत आल्यानंतर या कक्षात थांबता येणार आहे. महिला सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेविकांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचे आभार मानले आहेत.


Comments

Top