HOME   लातूर न्यूज

पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतलं शिवभोजन

बसस्थानकात सोय, अल्पदरात मिळणार जेवण, कुणी भुकेला राहणार नाही


पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतलं शिवभोजन

लातूर: महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात कोणीही भुकेले राहू नये यासाठी शासनाने शिवभोजन योजना आजपासून राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गोर गरीब व गरजू लोकांना दहा रुपये इतक्या कमी दरात जेवणाची थाळी मिळणार आहे. त्यामुळे यापुढील काळात कोणीही भुकेले पोटी राहणार नाही याची दक्षता शासनाने घेतलेली असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. जिल्हाधिकार्‍यांसोबत ना. देशमुख यांनीही या भोजनाचा आस्वाद घेतला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीनमध्ये शिवभोजनालयाचे उद्घाटन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागांमध्ये प्रति थाळी ५० रुपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये राहील. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झाल्या दहा रुपये व्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून शासनाकडून थेट जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येऊन त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रति थाळी चाळीस रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी पंचवीस रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल व प्रत्यक्ष ग्राहकांना फक्त दहा रुपयात भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या शिव भोजन योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू लोकांनी घेऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केले.
अशी असेल थाळी
शासनाकडून सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी तीस ग्रामच्या दोन पोळ्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा भात व १०० ग्रॅम वरण आदींचा समावेश असलेली शिवभोजनाची थाळी १० रुपयात देण्यात येणार आहे. ही भोजनालये दुपारी १२ ते ०२ या कालावधीत सुरू राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय तसेच प्रत्येक भोजनालयात कमाल ५०० थाळी सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.


Comments

Top