HOME   लातूर न्यूज

मांजरा परिवारातील कारखाने ऊसाला देणार पहिली उचल २२०० रुपये


मांजरा परिवारातील कारखाने ऊसाला देणार पहिली उचल २२०० रुपये

विलासनगर: मांजरा परिवारातील साखर कारखाने चालू हंगामात गळीतासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून प्रति मेट्रीक टन २२०० रुपये देणार असल्याचे मांजरा परिवाराचे मार्गदर्शक आ. दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत उपस्थितांनी या घोषणेला एकमुखी पाठिंबा देत निर्णयाचे स्वागत केले. ऊसाला नेहमीच उत्तम भाव देणारे मांजरा परिवारातील साखर कारखाने पहिली उचल काय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मांजरा परिवार दिलेला शब्द पाळतो या जाणिवेतून शेतकरी संघटनाही समन्वयाची भूमिका घेऊन काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर आ. दिलीपराव देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. स्वाभिमानी संघटनेचे अरुण कुलकर्णी, प्रवक्ता सत्तार पटेल, धर्मराज पाटील, नवनाथ पाटील, रवी गरड, व्यंकटराव करंडे, काकासाहेब जाधव आदी पदाधिकार्‍यांनी मांजरा परिवारातील कारखान्यांचे आभार मानले. २२०० रुपयांची पहिली उचल नियमाप्रमाणे अदा केली जाईल असे जाहीर करताना एकीकडे शेतकर्‍यांचे हित जोपासत, दुसरीकडे कारखाने व जिल्हा बॅंकेची आर्थिक घडी बिघडणार नाही याची काळजी घेतली आहे असेही आ. दिलीपराव देशमुख यांनी नमूद केले. या बैठकीला जिल्हा बॅंकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, मांजराचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, लक्ष्मण मोरे, सर्जेराव मोरे, अशोक काळे, जितेंद्र रणवरेही उपस्थित होते.


Comments

Top