HOME   लातूर न्यूज

शिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी दिला पर्याय


शिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी दिला पर्याय

लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावून वाहतूक व्यवस्थेत अमुलाग्र सुधारणा करण्यासाठी मनपा प्रशासनाने पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे निर्देश मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी एका पत्राद्वारे मनपा आयुक्तांना दिले आहेत. लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला चांगली शिस्त लावण्याच्या उद्देशाने मनपा प्रशासनाकडूनही सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. शहरांत अनेक ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु मनपा प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण शाखेला अद्यापपर्यंत सिग्नल व्यवस्थेबाबत कोणतीही सूचना दिली गेली नाही. सदोष वाहतूक व्यवस्थेमुळे वाहनधारकांना शहरात वाहन चालवणे अत्यंत जिकीरीचे बनले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, यासंदर्भात मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात अशोक गोविंदपूरकर यांनी पुढे असे नमूद केले आहे की, लातूर शहर महानगरपालिकेकडून शहरातील मेन रोड, हनुमान चौक ते शाहू चौक, गुळ मार्केट ते हत्तेनगर यांसह चार मोठ्या रस्त्यांवर पार्किंगसाठीचे पिवळे पट्टे त्वरित आखून द्यावेत. सुभाष चौक ते हनुमान चौक या वर्दळीच्या रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुभाजक बसवण्यात यावेत. कापड गल्ली व भुसार लाईनच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करावी. मुख्य पोस्ट ऑफिस ते चैनसुख रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था कार्यान्वित करावी. शहरात येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्समुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. रात्रीच्या वेळी शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स गुळ मार्केट मार्गे लोकमान्य टिळक चौकात येतात. त्याऐवजी रात्री ७ ते ११ या वेळेत सर्व खाजगी ट्रॅव्हल्स गरुड चौक, बसवेश्वर चौक मार्गे कान्हेरी रोडवरून राजस्थान शाळेसमोरील रस्त्यांवर येतील अशी व्यवस्था करण्याची सूचना वाहतूक नियंत्र शाखेस द्यावी. राजस्थान शाळेसमोरील जुन्या रेल्वे ट्रॅकच्या रस्त्यांवर ही वाहने आल्यास शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. या परिसरात मनपा लाईट, स्वच्छतागृह व इतर सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपरोक्त बाबींची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षाही अशोक गोविंदपूरकर यांनी व्यक्त केली आहे.


Comments

Top