HOME   लातूर न्यूज

ट्वेंटीवन’ भविष्यातील पथदर्शी साखर प्रकल्प ठरेल: आ अमित देशमुख

विलासरावांनी सुचविलेलं नाव, अल्पावधीत उभारणी, अद्ययावत तंत्रज्ञान, इथेनॉल, वीज निर्मिती


ट्वेंटीवन’ भविष्यातील पथदर्शी साखर प्रकल्प ठरेल: आ अमित देशमुख

लातूर: साखर उद्योगातील आंतरराष्ट्रीय अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, अत्यंत कमी म्हणजे विक्रमी अल्पकालवधीत टवेन्टीवन शुगर्स लि. हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, हा प्रकल्प भविष्यातील साखर उदयोगासाठी अनुकरणीय, पथदर्शी प्रकल्प म्हणुन ओळखला जाईल असा ठाम विश्वास माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेचा विषय असलेला लातूर तालुक्यातील मळवटी येथे टवेन्टीवन शुगर लि. या कारखान्याचे भूमिपूजन गुरुवार, दि.१९ एप्रिल रोजी शुभमुहूर्तावर सकाळी ६.३० वाजता अत्यंत छोटेखानी कार्यक्रमात माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व सौ अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन करण्यात आले. यावेळी आमदार देशमुख उपस्थितांशी संवाद साधात होते. याप्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, टवेंन्टीवन शुगर लि.चे समन्व्यक विजय देशमुख, अविर देशमुख, अवान देशमुख, अनिकेत घोरपडे, अनिरुध्द घोरपडे, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, रेणा साखरचे चेअरमन आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, अॅड.विक्रम हिप्परकर, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, मोईज शेख, अशोक गोविंदपूरकर, अॅड.दिपक सूळ, एस.आर.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वास सार्थ ठरवू
आमदार अमित देशमुख म्हणाले की, माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा साखर कारखान्याची उभारणी केली. त्यातून जिल्हयाच्या ग्रामीण भागास आर्थिक क्रांतीचा मार्ग सापडला. त्यातून पुढे मांजरा परिवारात माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा परिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहे. मागच्या २५-३० वर्षात या परिवाराच्या माध्यमातून निर्माण केलेल्या विश्वासाची पावती टवेन्टीवन शुगर्सचे सभासद होण्यासाठी मिळालेल्या भरघोस प्रतिसादातून मिळाली आहे. या प्रतिसादाबददल आभार व्यक्त करण्यासाठी खरेतर शब्दच नाहीत असे सांगून शेतकऱ्यांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी तो प्रतिसाद आपला आशिर्वाद म्हणून ऊपयोगी पडले असे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले.
ट्वेन्टिवन साहेबांनी सुचविलेले नाव
टवेन्टीवन या नावाचे गुपीत सांगताना हे नावही लोकनेते विलासराव देशमुख यांनी सूचवले होते असे सांगून त्यांनी उपस्थितांना चकीत केले. विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा आशा लोकउपयोगी कामात आपणास शक्ती देत असल्याचे त्यांनी म्हटले.
जलद गतीने उभारणी
वास्तविक पाहता संपलेल्या गळीत हंगामात ऊसाची लावड कमी होती तरी मांजरा परिवारातील कारखान्यांनी विक्रमी ऊस गाळप केले आहे. या कारखान्याच्या माध्यमातून ८०० कोटी रुपये जिल्हयातील शेतकऱ्यांच्या घरात पोंहचले आहेत त्यातून जिल्हयाचा व्यापारही वाढला आहे. इतर शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरऱ्यांनी यावर्षी आणखीन ऊस लागवढ केली आहे.
विक्रमी ऊस उत्पादन होणार असल्याने त्या ऊसाचे गाळप होईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांच्या मनात झाली आहे. नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात बाहेर जिल्हयातील साखर कारखान्यांनी कांही ऊस गाळपासाठी नेला आहे. आगामी वर्षात ते कारखाना ऊस घेवून जातीलच असे सांगता येत नाही. जिल्हयात आगामी वर्षात अतिरिक्त ऊस निर्माण होण्याची शक्यता असल्याने टवेन्टीवनची उभारणी अत्यंत जलद गतीने करणे गरजेचे आहे. तशा सूचना संबंधीत कंपन्यांना देवून त्यासाठी पूर्व तयारी केली आहे.
आंतरराष्ट्रीय अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रकल्प
टवेन्टीवन शुगर्स लि. या प्रकल्पासाठी सध्याचे सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प भविष्यात साखर उदयोगासाठी पथदर्शी प्रकल्प ठरेल असे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगीतले. सेंद्रीय ऊस शेती हा देशातील पहिला प्रयोग आपण जिल्हयात राबवित असल्याचे सांगून गंधकमुक्त साखर तयार करणारा टवेन्टीवन शुगर हा साखर कारखाना असल्याचेही त्यांनी म्हटले. येथे उत्पादीत होणाऱ्या साखरेस जागतीक पातळीवर मागणी राहिल असा विश्वास व्यक्त केला.
गंधकमुक्त साखर उत्पादनाबरोबरच याठिकाणी ईथेनॉल आणि सहवीज निर्मिती प्रकल्पाचीही उभारणी होत असल्याचे सांगून या प्रकल्पासाठी शेतजमीन उपलब्ध करुन देणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी यावेळी विशेष आभार मानले. ते शेतकरी या प्रकल्पाचे एक घटक असून त्यांना सन्मानपूर्वक प्रकल्पात सामावून घेतले जाईल असे आश्वासनही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिले.


Comments

Top